'तिच्या' मासिक पाळीचाही सन्मान करू...

हल्ली सणांचे असे झाले आहे की ते महोत्सवासारखे साजरे होऊ लागले आहेत. नुकतीच दिवाळी आपण सर्वांनी साजरी केली. दिव्यांची रोषणाई आणि पुष्प हारांच्या सजावटी, कपड्यांची खरेदी, घरोघरी आकाशदिवे , जनावरांना सजविण्याचे सामान असे अनेक साहित्य आपण खरेदी केले. एका अर्थाने बाजारपेठेत पैशांची देखील आवक-जावक झाली. पहिला दिवस, दुसरा दिवस असे करत करत दिवाळीचे पाचही दिवस आपण थाटामाटात आणि आनंदात साजरे केले. या सर्वात एक मुद्दा नेहमीच पुढे येतो तो म्हणजे मासिक पाळी आणि सणांचा. 

महिलांना दर महिन्यात येणारी मासिक पाळी  अतिशय गरजेची असते. निसर्गाने दिलेले वरदान म्हणजे महिलांचे गर्भाशय आणि मासिक पाळी. एखादी मुलगी ऋतुमती होत नसेल तर तिला मूलबाळ होत नाही. तिला हिणवले जाते. काही ठिकाणी स्त्री जातीतून तिला बाजूला सारले जाते. किंबहूना तिला वांझ देखील ठरविले जाते. परंतु एखाद्या मुलीच्या वाट्याला याबाबतीत जन्मतः जे काही येतं ते केवळ आणि केवळ निसर्गतः असतं. गर्भाशय असलं तर ते काढून टाकता येतं. पण जन्मतः नसेल तर ते नवीन लावता येतं की नाही हा संशोधनाचा मुद्दा आहे. ह्यासारखेच मासिक पाळीचे देखील आहे. निसर्गाने दिलेल्या या वरदानाला पूर्वी विटाळ म्हणून गणल्या जात होते. मासिक पाळी आलेल्या बाईला स्वैपाकघर , देवघर या सारख्या पवित्र स्थळांपासून दूर ठेवल्या जात होते. पाच दिवस तिच्या वाट्याला विटाळाच्या नजरा येत असे. काही ठिकाणी अजूनही अशा रीती सुरूच आहेत. याबद्दल आपल्याला माहिती आहेच. याबाबत अनेक  वाद - विवाद देखील झाले आहेत. 

आता मुद्दा असा आहे की कुठलाही सण आला की ऋतुमती असणाऱ्या बाईने पूजा करू नये म्हणून तिला सांगितल्या गेले आहे. आता जर देवघरात जाणेच टाळले जाते किंबहूना देवघरावर सावलीच पडायला नको असे सांगितल्या जाते तर पूजा करणे लांबच राहिले. 

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एकाने फेसबुकवर पोस्ट शेअर केली की लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मासिक पाळी आली असेल तर पूजा करावी की नाही? तर मला वाटतं पूजा करावी. कारण जितके देव पवित्र आहेत तितकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त महिलांची मासिक पाळी पवित्र आहे. कारण या गोष्टीमुळे अख्खं जग निर्माण झालेलं आहे. हे जग ज्या भरवशावर उभं आहे ती गोष्ट अपवित्र किंवा विटाळ मानावी अशी कशी असू शकते? त्याचप्रमाणे दुर्गा, लक्ष्मी , पार्वती, रुक्मिणी, राधा, सरस्वती, काली या सर्व देवी आहेत . या तशाच देवी आहेत जशा आपल्या संसारात, या जगात या भूतलावर बायका आहेत. या भूतलावर  बायका देखील आपापल्या क्षेत्रात विविध भूमिका बजावणाऱ्या देवी आहेत. यांना विशिष्ट प्रकारची दैवी शक्ती आहे ज्याच्या साह्याने त्या आपल्या भूमिका चोख पार पाडू शकतात. फरक इतकाच आहे की यांची पूजा आपण करीत नाही. पण त्या पूज्य आहेत. देवळातल्या देवीची पूजा आपण करतो आणि ही चांगली गोष्ट आहे. त्याचा विरोध नाहीच. परंतु या भूतलावर वावरणाऱ्या बायकांची आपण पूजा करीत नसलो तरी त्यांना त्यांच्या कर्तृत्वाचा  सन्मान आणि आदर आपण द्यायला हवा. 

सर्वात महत्वाचं म्हणजे बायकांनीच बायकांना याबाबत जागरूक करायला हवं. त्यांना सहकार्य करायला हवं. त्यांना आधार द्यायला हवा. कोणताही बदल एका दिवशी होत नसतो तर त्यासाठी काळ जावा लागतो. हळूहळू मासिक पाळी विषयीचे अनेक दुराग्रह लयास गेलेले आहेत; परंतु पूर्णपणे संपलेले नाहीत. बदल हे इतरांना सांगून होत नसतात. ते आपण स्वतः पासून करणे गरजेचे असतात. आपण जग बदलू शकत नाही. स्वतःला बदलवूया ना. ते आपल्या हातात आहे. ज्या गोष्टी गरजेच्याच नाहीत त्यांना बेदखल करून स्वतःची  अस्मिता टिकवून ठेवूया. 

गीता देव्हारे - रायपुरे

चंद्रपूर